निधी मिळाला म्हणजे जनतेचे प्रेम मिळाले असे नाही – मुरलीधर मोहोळ
एखाद्या उमेदवाराला कार्यक्रमात निधी दिला म्हणजे लोकांचं प्रेम मिळालं असं नाही. तुम्ही लोकांसाठी काय आहात हे जास्त महत्वाचे आहे. माझ्यासोबत पुणेकरांचे प्रेम आहे. आम्ही पुणेकर नागरिकांचे मनं जिंकली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.निधी मिळाला म्हणजे जनतेचे प्रेम मिळाले असे नाही – मुरलीधर मोहोळ
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर, तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या तीनही उमेदवारांनी विविध माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात मविआच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात आमदार रवींद्र धंगेकर यांना कार्यकर्त्यांनी ४२ हजारांच्या निधीही थैली दिली.
त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत मोहोळ यांना विचारले असता मोहोळ म्हणाले, कोथरूडमधील एका कार्यक्रमात कोणाला तरी (रविंद्र धंगेकर) नागरिकांनी निधी दिल्याचे सांगत असला, तर त्यावर मला बोलायच नाही. पण तुम्हाला (रविंद्र धंगेकर) निधी मिळाला म्हणजे प्रेम मिळाले असे होत नाही. पण माझ्यासोबत पुणेकरांचे प्रेम आहे. लोकांसाठी तुम्ही काय करणार आहात, हे अधिक महत्वाचे आहे.
मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, भाजपा हा लोकशाही मानणारा असून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी मुरलीधर मोहोळ आहे. माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला पक्षाने पुणे लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. देशात ४०० हून अधिक खासदार निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.आजवर पुणेकर नागरिक नेहमीच भाजप पक्षाच्या पाठीशी राहिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहतील आणि सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
