एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून “मानसिक आरोग्याची संवेदनशीलता” या विषयावर पथनाट्य सादर
एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च येथील विद्यार्थ्यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सेंट तेरेसा स्कूल, लोणी-काळभोर येथे “मानसिक आरोग्याची संवेदनशीलता” या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले.या पथनाट्यातून शालेय विद्यार्थ्यांना भेडसावणारा मानसिक ताण, पालकांच्या अपेक्षा, अभ्यासाचा अतिरिक्त तणाव आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवरील उपाय या विषयांवर प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी पालक व शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावरही या सादरीकरणातून प्रकाश टाकण्यात आला.या पथनाट्यातून विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना – जसे की मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, नियमित व्यायाम व प्राणायामाचा अंगीकार करणे आणि सकारात्मक विचारांचा अवलंब करणे – यांची माहिती देण्यात आली.
उत्कृष्ट सादरीकरणामुळे उपस्थित लहानग्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि आत्मचिंतनाची भावना निर्माण झाली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सेंट तेरेसा स्कूलचे मुख्याध्यापक विनय सुकुल आणि उपमुख्याध्यापिका सॅलविना सुकुल यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेचा शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राध्यापक व छात्र-अध्यापक यांनी कार्यक्रमासाठी मोठे योगदान दिले.एमआयटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड आणि कुलगुरू डॉ. राजेश एस. यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि अधिष्ठाता डॉ. प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून डॉ. नीता म्हवाण यांनी कार्यभार सांभाळला.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून ‘सुदृढ मन, सुदृढ समाज’ घडविण्याचा संदेश एमआयटी एडीटी विद्यापीठाने दिला.
