भाजपाचे इच्छूक उमेदवार वाऱ्यावर; मुलाखती नव्हे तर थट्टा – प्रभाग ३६, ३७, ३८ परिसरात तीव्र नाराजी
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने इच्छूक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारून घेतलेल्या मुलाखती केवळ औपचारिक ठरल्याचा आरोप पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून होत आहे. ऐनवेळी नेत्यांची मुले, नातेवाईक व मर्जीतले उमेदवार पुढे आणले जाणार असल्याच्या चर्चांमुळे प्रभाग क्रमांक ३६, ३७, ३८ तसेच कात्रज परिसरात निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.भाजपाचे इच्छूक उमेदवार वाऱ्यावर; मुलाखती नव्हे तर थट्टा – प्रभाग ३६, ३७, ३८ परिसरात तीव्र नाराजी
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने प्रत्येक प्रभागातून इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. या प्रक्रियेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. त्यानंतर मुलाखतीही घेण्यात आल्या. मोठ्या संख्येने इच्छूकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले. मात्र या मुलाखतीदरम्यान अनेकांना अप्रिय अनुभव आल्याची चर्चा शहरभर सुरू झाली.
“भाजपा हा देशातील नंबर एकचा पक्ष आहे, त्यामुळे अर्ज मोठ्या संख्येने येणारच,” असे पुणे शहराचे पदाधिकारी माध्यमांसमोर वारंवार सांगत होते. यामुळे इच्छूक उमेदवारांनाच सूचक इशारा दिला जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. सोशल मीडियावर मुलाखतींचे फोटो प्रसिद्ध करून पारदर्शकतेचा देखावा उभा करण्यात आला.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस उरले असतानाही पुणे शहर भाजपाकडून अद्याप अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नाही. बंडखोरी होऊ नये, या भीतीपोटी यादी जाणीवपूर्वक लांबवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
त्याचवेळी काही संभाव्य उमेदवारांची नावे बाहेर येऊ लागली आहेत. या नावांमध्ये मोठ्या नेत्यांचे पुत्र व नातेवाईक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, यापैकी अनेकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेले नाहीत, तसेच ते मुलाखतींनाही उपस्थित नव्हते, असा आरोप इच्छूक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. अशा आयत्या उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याची माहिती पसरताच सर्वसामान्य इच्छूकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
“निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून आयतगब्बूंना घोड्यावर बसवण्याचा प्रकार शहर पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे,” अशी थेट टीका केली जात आहे. अर्ज मागवणे आणि मुलाखती घेणे ही प्रक्रिया केवळ फार्स ठरल्याची भावना अनेक इच्छूक व्यक्त करत आहेत.
‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख सांगणाऱ्या भाजपाने घराणेशाहीच्या बाबतीत काँग्रेसपेक्षाही पुढे पाऊल टाकल्याची उद्विग्न प्रतिक्रिया पक्षातील इच्छूकांकडून व्यक्त होत आहे.
प्रभाग २१ मध्येही तशीच स्थिती
प्रभाग क्रमांक २१ (मुकुंद नगर, महर्षी नगर, सॅलसबरी पार्क) येथेही तिकीट वाटपात हाच अनुभव येत असल्याचा आरोप आहे. पूर्वाश्रमीचे निष्ठावंत कार्यकर्ते डावलून मर्जीतल्यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे. रीतसर प्रक्रियेतून पुढे आलेल्या प्रामाणिक इच्छूकांना डावलण्यात आल्याचा थेट आरोप स्थानिक कार्यकर्ते करत आहेत.
“भाजपाचे तिकीट मिळाले की विजय निश्चित,” या समजुतीतून तडजोडीचे उमेदवार उभे केले जात असल्याने प्रामाणिक इच्छूक व त्यांच्या समर्थकांची नाराजी भाजपाला निवडणुकीत अडचणीत आणू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुलाखतीला न आलेल्यांना विशेष लॉबीमार्फत उमेदवारी दिली जात असल्याच्या चर्चांनी शहर भाजपात अस्वस्थता वाढवली आहे.


