Latest News

प्रभाग २४ मध्ये राजकीय चित्र बदलले; उमेश शेडगेंचा भाजपमध्ये प्रवेश, बिडकरांना बळ

Share Post

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, रास्ता पेठेतील शिवसेनेचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते उमेश कृष्णा शेडगे यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच माजी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.उमेश शेडगे यांनी प्रभाग क्रमांक २४ मधून भरलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. गेल्या २० वर्षांपासून मराठा मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले उमेश शेडगे यांनी मनसे तसेच शिवसेनेत एकनिष्ठपणे काम केले आहे. परिसरामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून सामाजिक व स्थानिक पातळीवर त्यांची ओळख आहे.

पक्षप्रवेशावेळी बोलताना उमेश शेडगे म्हणाले की, “राष्ट्र प्रथम हे ध्येय समोर ठेवून शहर व देशाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने काम करत आहे. प्रभागामध्ये माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राबवलेली विकासकामे, नागरिकाभिमुख उपक्रम आणि रोजगारनिर्मितीची दिशा प्रेरणादायी आहे. हीच विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २४ मध्ये गणेश बिडकर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत असून, आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक भक्कम होताना दिसत आहे. प्रभागातील राजकीय समीकरणांमध्ये या घडामोडीमुळे महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.