Daily UpdateNEWSPune | NEWS

राजकीय रणधुमाळीत संयमाचे राजकारण; लहू बालवडकरांचा भाजप कार्यकर्त्यांना संदेश

Share Post

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना, भाजपचे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून दिलेला संयमाचा आणि शिस्तीचा संदेश विशेष लक्षवेधी ठरत आहे. प्रचाराच्या रणांगणात आक्रमक भाषणबाजी, टीका-टिप्पणी आणि वैयक्तिक आरोपांची धूळ उडत असतानाच, “संयम, नियोजन आणि संघटनात्मक शिस्त” या तीन सूत्रांवरच भाजपाची वाटचाल असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.बालवडकर यांनी स्पष्ट केले की, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा संघटनेचा सैनिक आहे. उमेदवारी मिळो वा न मिळो, पक्ष, नेतृत्व आणि विचारधारा यांच्याप्रती निष्ठा अबाधित ठेवणे हीच भाजपाची ओळख आहे. “शांतता भंग करण्याचे प्रयत्न होत असतील, तर त्याला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे,” असा इशारा देत त्यांनी संयमालाच शक्तीचे रूप दिले.

या भूमिकेतून त्यांनी अप्रत्यक्षपणे उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरही बोट ठेवले. “पद, पैसा किंवा प्रसिद्धी मिळाल्यानंतर मागे वळून पाहिलं जात नाही का?” असा प्रश्न उपस्थित करत, शिवराळ भाषा आणि खालच्या पातळीवरील टीकेचा मार्ग भाजप कार्यकर्त्यांनी स्वीकारू नये, असे आवाहन त्यांनी केले. गरज पडल्यास त्याच भाषेत उत्तर देता येते, मात्र तेच आपले राजकारण नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.विशेष म्हणजे, उमेदवारी डावलली गेल्याने काहींकडून सुरू असलेल्या कुरघोड्यांकडे इशारा करताना, “हे उद्योग तात्पुरते असतात; त्याचे परिणाम कायमस्वरूपी असतात,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला. भाजपाचा कार्यकर्ता हा संयम सोडून प्रतिक्रिया देणारा नसून, योग्य वेळ आल्यावर निर्णायक उत्तर देणारा असतो, हे त्यांनी अधोरेखित केले.

एकूणच, निवडणुकीच्या गदारोळात लहू बालवडकर यांनी दिलेला हा संदेश केवळ समर्थकांसाठी नाही, तर संपूर्ण राजकीय वर्तुळासाठी आहे. आक्रमकतेपेक्षा शिस्त, व्यक्तिकेंद्री राजकारणापेक्षा संघटनात्मक बांधिलकी आणि तात्कालिक फायद्यांपेक्षा दीर्घकालीन परिणामांचा विचार—हीच भाजपाची राजकीय वाटचाल असल्याचे या भूमिकेतून स्पष्ट होते. आता या संयमाच्या भूमिकेला मतदारांचा कितपत पाठिंबा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Politics of restraint amidst the political turmoil; Lahu Balwadkar's message to BJP workers.
Politics of restraint amidst the political turmoil; Lahu Balwadkar’s message to BJP workers.