शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का; प्रभाग ९–११ मधील उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील उबाठा गटाचे अधिकृत तसेच बंडखोर उमेदवार शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.कोथरुड येथील राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ना. पाटील यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का; प्रभाग ९–११ मधील उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश
प्रभाग क्रमांक ९ (क) आणि (ड) तसेच प्रभाग क्रमांक ११ (अ) मध्ये उबाठा गटाची संघटनात्मक पकड कमकुवत झाल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट झाले आहे. प्रभाग ९ मधील बंडखोर उमेदवार महेश सुतार (ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर, तसेच प्रभाग ११ (अ) मधील अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.या पक्षप्रवेशामुळे उबाठा गटाला प्रभाग पातळीवर मोठा फटका बसला असून, भाजपची संघटनात्मक ताकद आणि निवडणुकीतील आघाडी अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “भाजपसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. याआधीच दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता प्रभाग ९ आणि ११ मधील उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद दुपटीने वाढली आहे. पुणे महापालिकेत भाजपच्या विजयाची ही ठाम नांदी आहे.”या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत उपस्थित होते. यासोबतच भाजपचे नेते डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


