प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार झंझावात; मंगळवार पेठेत तरुणांचा पक्षप्रवेश, भाजपचा गड अधिक मजबूत
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने जोरदार वेग घेतला असून भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह सर्व उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे. मंगळवार पेठ परिसरात आयोजित प्रचार दौर्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दाट लोकवस्तीच्या भागात हजारो नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली.मंगळवार पेठेतील विविध भागांमध्ये घरभेटी, नागरिकांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करत भाजप उमेदवारांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला. यावेळी नागरिकांनी विकासकामांबाबत विश्वास व्यक्त करत भाजपला पाठिंबा दर्शविला.प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार झंझावात; मंगळवार पेठेत तरुणांचा पक्षप्रवेश, भाजपचा गड अधिक मजबूत
माध्यमांशी संवाद साधताना उमेदवार गणेश बिडकर म्हणाले,“प्रभाग क्रमांक २४ मध्ये निवडणुकीबाबत मोठा उत्साह आहे. मंगळवार पेठ हा कष्टकरी आणि दाट लोकवस्तीचा भाग आहे. कोविड काळात तसेच प्रशासकराजाच्या काळात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत होते. याच सेवाभावी भूमिकेमुळे या भागात भाजपसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनता आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.”
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत विरोधक असतातच, मात्र भाजप हा पक्ष नेहमी विकासाचा मुद्दा घेऊन, हात जोडून जनतेसमोर जातो. “विकास, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर जनतेकडून आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रचार दौर्यादरम्यान मंगळवार पेठेतील आंबेडकर वस्तीमधील अनेक तरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे प्रभागात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून तरुणाईचा वाढता पाठिंबा भाजपच्या पाठीशी उभा राहत असल्याचे चित्र आहे.बिडकर यांनी या भागातील नागरिकांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “नागरिकांच्या अपेक्षांची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. निवडून आल्यावर निश्चितच कामाच्या माध्यमातून या विश्वासाला न्याय देऊ,” असे आश्वासन दिले.
प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल परिसर) हा पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला मानला जात असून, अनुभवी नेते गणेश बिडकर विकास व जनसेवेच्या मुद्द्यांवर प्रभावी प्रचार करत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या एकत्रित प्रचारामुळे प्रभाग २४ मध्ये भाजपचा गड अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


