बोपोडीकरांना सुसज्ज आरोग्यसेवेची हमी; ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणार – सनी विनायक निम्हण
अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा या प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा आहेत. बोपोडी परिसरातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, येथील महापालिकेचे दोन दवाखाने अद्ययावत करण्यासोबतच सुसज्ज ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केला.बोपोडीकरांना सुसज्ज आरोग्यसेवेची हमी; ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणार – सनी विनायक निम्हण
आज बोपोडी परिसरात भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांच्यासह परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. पदयात्रेदरम्यान दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांशी संवाद साधताना सनी निम्हण म्हणाले की, बोपोडी परिसराचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. सध्या बोपोडीतील नागरिकांना उपचारासाठी पिंपरी येथील वाय.सी.एम. हॉस्पिटल, खडकीतील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल किंवा पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात जावे लागते. बोपोडी परिसरात असलेला शेवाळे दवाखाना कार्यरत असला तरी तेथे केवळ ओपीडी सुविधा उपलब्ध असून आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव आहे.
खेडेकर दवाखान्यात अत्याधुनिक सोयी-सुविधांसह सुसज्ज ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, तर संजय गांधी दवाखाना जो सध्या बांधून पूर्ण झाला आहे पण अद्याप सुरू झालेला नाही, तो लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल. या माध्यमातून बोपोडी परिसरातील नागरिकांची आरोग्यसेवा अधिक मजबूत, सुलभ आणि दर्जेदार केली जाईल, असे आश्वासन सनी निम्हण यांनी दिले.


