लोकभावनांना प्राधान्य देत कस्तुरबा व डॉ. आंबेडकर वसाहतीचा सर्वांगीण विकास करू – सनी निम्हण
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची धग वाढत असून औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांचा प्रचार वेगाने सुरू आहे. प्रचारादरम्यान त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत विकासाबाबतची भूमिका स्पष्ट केली.लोकभावनांना प्राधान्य देत कस्तुरबा व डॉ. आंबेडकर वसाहतीचा सर्वांगीण विकास करू – सनी निम्हण
भाजप हा विकास करताना नेहमी लोकांना केंद्रस्थानी ठेवणारा पक्ष असल्याचे सांगत, कस्तुरबा वसाहत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचा विकास हा स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊनच करण्यात येईल, असे सनी निम्हण यांनी ठामपणे सांगितले. लोकांची मते, गरजा आणि अपेक्षा समजून घेऊनच विकासाची दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रचाराच्या निमित्ताने औंध परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. कस्तुरबा वसाहत, जगदिश नगर, कांबळे वस्ती, संजय गांधी वस्ती तसेच स्पायसर वस्ती या भागांतून ही पदयात्रा काढत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मतदारांशी संवाद साधताना सनी निम्हण म्हणाले की, झोपडपट्टी भागांचा विकास करताना एसआरए करायचे की नाही, हा निर्णय स्थानिक रहिवाशांचाच असणार आहे. भाजप नेहमीच लोकांच्या भावना समजून घेऊन विकासाला प्राधान्य देतो. त्यामुळे वस्ती विभागातील सुधारणा, मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना नागरिकांच्या मतांचा आदर केला जाईल.
या वेळी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


