पुणे महानगरपालिका निवडणूक 2026: प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजप उमेदवार गणेश बिडकर यांचे संकल्पपत्र जाहीर
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती, कमला नेहरू रुग्णालय परिसर) मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह पॅनलमधील उमेदवारांनी आपले संकल्पपत्र जाहीर केले आहे. या संकल्पपत्रात प्रभागातील नागरिकांच्या प्रमुख समस्या सोडवण्यावर विशेष भर देण्यात आला असून वाहतूक नियोजन, आरोग्यसुविधा, पाणीप्रवाह व्यवस्था, सुरक्षा आणि प्राचीन वारसा जतन यांसारख्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.पुणे महानगरपालिका निवडणूक 2026: प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजप उमेदवार गणेश बिडकर यांचे संकल्पपत्र जाहीर
या संकल्पाबाबत बोलताना गणेश बिडकर म्हणाले की, शहरातील मोठ्या प्रकल्पांसोबतच प्रभाग पातळीवरही ठोस आणि परिणामकारक विकास साध्य करण्याचा आमचा निर्धार आहे. या संकल्पपत्रातील एक महत्त्वाचा आणि वेगळा निश्चय म्हणजे ‘संविधान सन्मान अभ्यासिका’ सुरू करण्याचा निर्णय असून, यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. यासोबतच कमला नेहरू रुग्णालयातील आरोग्यसुविधा अधिक सक्षम आणि बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे.
वाहतुकीच्या समस्येवर बोलताना बिडकर म्हणाले की, मेट्रोच्या विस्तारीकरणामुळे प्रभागातील नागरिकांना शहरभर अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येईल. तसेच इलेक्ट्रिक बस सेवा आणि पुण्यदर्शन सेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा संकल्प या संकल्पपत्रात करण्यात आला आहे. पावसाळ्यात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नाल्यांना सीमाभिंती बांधणे, कल्व्हर्टची सुधारणा करणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येतील.
प्रभाग हा पुण्याच्या मूळ शहराचा भाग असल्यामुळे रस्ते रुंदीकरणाला काही नैसर्गिक मर्यादा आहेत. त्यामुळे पार्किंगची समस्या आणि गर्दीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नियोजन आणि व्यवस्था करण्यात येणार असल्याचे बिडकर यांनी सांगितले. प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस पेट्रोलिंग वाढवली जाईल. तसेच प्राचीन वारसास्थळांचे जतन व संवर्धन हा एक महत्त्वाचा आणि प्राधान्याचा कार्यक्रम म्हणून राबवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिलेला शब्द पाळणे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे हा आमच्या कर्तव्याचा भाग आहे, असे सांगत बिडकर म्हणाले की, शहरातील मेट्रो, नदीकाठ सुधारणा, २४ तास पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा थेट लाभ प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांना मिळेल. याबाबत त्यांनी नागरिकांमध्ये विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, बिडकर यांच्या संकल्पपत्रामध्ये जाहीर करण्यात आलेल्या ‘संविधान सन्मान अभ्यासिका’ या संकल्पनेबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त केला असून या उपक्रमाचे त्यांनी जाहीर कौतुक केले आहे.
याचवेळी रामदास आठवले यांनी भीमनगर आणि मंगळवार पेठेतील जनतेला आवाहन करताना सांगितले की, महायुतीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. महायुती ही आपलीच आहे, असे स्पष्ट आवाहन त्यांनी जनतेला केले.


