Daily UpdateNEWSPune | NEWS

औंध–बोपोडी विकासासाठी ठोस आराखडा; सनी विनायक निम्हण यांची ग्वाही

Share Post

महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे जगणे अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान करणाऱ्या विकासकामांवर भर देणार असल्याचा ठाम निर्वाळा भारतीय जनता पक्ष – रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी दिला आहे.औंध–बोपोडी विकासासाठी ठोस आराखडा; सनी विनायक निम्हण यांची ग्वाही

औंध येथील औंध रोड सोसायटी असोसिएशनच्या एम.एम. हॉटेलमधील सभागृहात आयोजित बैठकीदरम्यान परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधताना सनी विनायक निम्हण बोलत होते. या बैठकीला शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह औंध रोड परिसरातील विविध सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, औंध–बोपोडी परिसरातून बोपोडीकडून एक आणि बाणेर फाट्याकडून दुसरा असे दोन मेट्रो मार्ग जात आहेत. या मेट्रो प्रकल्पांचा प्रत्यक्ष लाभ बोपोडी व औंधमधील नागरिकांना अधिक प्रभावीपणे मिळावा, तसेच दैनंदिन बाजारहाट व इतर कामांसाठी त्यांना सहज आणि जलद प्रवास करता यावा, या दृष्टीने मेट्रो स्थानकांना जोडणारी वर्तुळाकार शटल बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

या शटल बस सेवेमुळे प्रभागातील कोणत्याही भागातून नागरिकांना २० ते २५ मिनिटांच्या आत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे. ही सुविधा वेळेची बचत करणारी, खर्च कमी करणारी आणि पर्यावरणपूरक ठरेल, असा विश्वास सनी निम्हण यांनी व्यक्त केला.

यासोबतच प्रभागातील नदी पात्राच्या परिसराची नियोजनबद्ध आणि शाश्वत सुधारणा करणे हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या प्राधान्यक्रमात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नदीपात्र विकास करताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल. हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने राबवण्यात येईल, असा दावा त्यांनी केला.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सनी निम्हण यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, सनी निम्हण हे एका अनुभवी राजकीय परिवारातून येतात. त्यांचे वडील विनायक निम्हण यांनी या भागाचे सलग तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले असून ते नगरसेवकही होते. सनी निम्हण हे उच्चशिक्षित, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व असून आगामी काळात ते कालबद्ध पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडतील आणि दिलेली कामे वेळेत पूर्ण करतील, याची खात्री आहे, असे शिरोळे यांनी नमूद केले.

औंध–बोपोडी प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, वाहतूक सुलभीकरण, पर्यावरणपूरक विकास आणि सार्वजनिक सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सनी विनायक निम्हण यांनी मांडलेली ही विकासदृष्टी आगामी महापालिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

औंध–बोपोडी विकासासाठी ठोस आराखडा; सनी विनायक निम्हण यांची ग्वाही