म्हाळुंगे गावात भाजपची भव्य पदयात्रा; ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विकासाला गती
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी म्हाळुंगे गावात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला म्हाळुंगेवासियांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत भाजपच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा दर्शवला.म्हाळुंगे गावात भाजपची भव्य पदयात्रा; ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विकासाला गती
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या पदयात्रेचा शुभारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भैरवनाथ मंदिरात दर्शन व आशीर्वाद घेऊन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे म्हाळुंगे गावाच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत आग्रही आहेत. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नागरिकांच्या सूचनांचा समावेश करून अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधला जात आहे. त्यामुळे हा विकास आराखडा लवकरच सर्वानुमते मंजूर होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला शहरभरातून मोठा पाठिंबा मिळत असून प्रभाग क्रमांक ९ मध्येही वातावरण भाजपच्या बाजूने आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीत भाजपच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात मेट्रो, नदीसुधार प्रकल्प, समान पाणीपुरवठा यांसारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाले असून त्यामुळे शहराचे स्वरूप बदलले आहे, असे पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत पक्षाला कठोर निर्णय घेत ४२ जणांना उमेदवारी नाकारावी लागली. तरीही कोणतीही नाराजी न दाखवता हे सर्व कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. विद्यमान नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनाही यावेळी उमेदवारी देता आली नाही, मात्र प्रल्हाद सायकर व स्वप्नाली सायकर यांनी पक्षशिस्त पाळत भाजपच्या विजयासाठी काम सुरू ठेवले आहे.
काही विरोधकांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी टीका केली जात असली, तरी भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राष्ट्रहित सर्वोच्च मानून काम करणारा हा पक्ष देशाला सक्षम, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामुळेच भाजप इतर पक्षांपेक्षा वेगळा ठरतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपचे उमेदवार लहू बालवडकर हे महाराष्ट्रात विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या पदयात्रेत प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, मयुरी कोकाटे, निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, शरद भोते, राकेश पाडाळे, विनायक चिवे, शांताराम पाडाळे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


