निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय धक्का; प्रभाग २४ मध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते भाजपात
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली असून, आता प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये राजकीय वातावरण तापले असून, सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांचा ओढा भारतीय जनता पक्षाकडे वाढताना दिसत आहे.आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, निवडणूक प्रमुख तसेच प्रभाग क्रमांक २४ चे अधिकृत भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश कार्यक्रमात पुणे महानगरपालिका मनसे कामगार आघाडीचे प्रमुख रितेश शिकोत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी भगवान श्री जाहर वीर गोगाजी सेवा समिती तसेच महाराष्ट्र महर्षी वाल्मिक महाराज संघटना यांनी देखील भारतीय जनता पार्टी व उमेदवार गणेश बिडकर यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला.याप्रसंगी बोलताना रितेश शिकोत्रे म्हणाले की, प्रभाग क्रमांक २४ चे उमेदवार तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर यांनी प्रभागाच्या विकासासाठी व पुणे शहरासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्यांची असलेली तळमळ, सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोन पाहता, आम्ही संघटना व समितीच्या वतीने संपूर्ण ताकदीनिशी त्यांना पाठिंबा देत आहोत.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजपकडे होत असलेला हा मोठा प्रवेश आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपची ताकद अधिक मजबूत करणारा ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून सांगितले जात आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय धक्का; प्रभाग २४ मध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते भाजपात


