प्रभाग २४ मध्ये भाजपाची पकड घट्ट; राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधील प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल परिसराचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक २४ हा भाजपाचा बालेकिल्ला आणखी मजबूत होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील प्रमुख नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे स्पष्टपणे भाजपाच्या बाजूने झुकली आहेत.आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या घडामोडीमुळे राष्ट्रवादीला प्रभाग क्रमांक २४ मध्ये मोठा राजकीय धक्का बसला असून, भाजपसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उपाध्यक्ष वनिता विश्वास जगताप, सरचिटणीस अमर सुभाष कोरे आणि सदस्य आयेशा अमर कोरे यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत पक्षावर विश्वास व्यक्त केला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रभागातील राजकीय दिशा बदलली होती. आता राष्ट्रवादीतील नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपाची पकड अधिक भक्कम झाली असून, विरोधकांची संघटनात्मक ताकद कमकुवत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वनिता जगताप या सामाजिक व सार्वजनिक कामांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आल्या आहेत, तर अमर कोरे आणि आयेशा कोरे यांनी स्थानिक स्तरावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्य केले आहे. त्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक रचनेला मोठा धक्का बसला असून, भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांना निवडणुकीत अधिक बळ मिळाले आहे.गणेश बिडकर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे प्रभागातील नागरिकांचा विश्वास भाजपावर अधिक दृढ झाला आहे. कमला नेहरू व केईएम हॉस्पिटलमधील सुविधा सुधारणा, महिलांसाठी ‘लाईट हाऊस’ उपक्रमातून रोजगारनिर्मिती, तसेच पायाभूत सुविधांचा विकास या कामांमुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. “विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वामुळेच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” अशी प्रतिक्रिया प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.


