प्रचार सभेतच नाराजी उघड; ‘दादा हाच का तुमचा वादा?’ पोस्टर्सनी खळबळ
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याच प्रभागातून भाजपने लोकप्रियता घटल्याच्या कारणास्तव माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना उमेदवारी नाकारली होती. पुण्यात भाजपने यंदा तब्बल ४० विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापत मोठा निर्णय घेतला असून, बहुतांश नेत्यांनी पक्षनिष्ठा राखत पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.प्रचार सभेतच नाराजी उघड; ‘दादा हाच का तुमचा वादा?’ पोस्टर्सनी खळबळ
मात्र प्रभाग क्रमांक ९ मध्ये चित्र वेगळे दिसून येत आहे. भाजपने काही काळ थांबण्याचा सल्ला दिल्यानंतरही अमोल बालवडकर यांनी अति आत्मविश्वासातून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत भाजपशी बंडखोरी केली. या निर्णयामुळे भाजपचा एक मोठा समर्थक वर्ग नाराज झाला असून, आता ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उफाळून येताना दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारासाठी प्रभाग क्रमांक ९ मध्ये उपस्थित राहिले असताना, सभास्थळी लावण्यात आलेल्या काही पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुस, बाणेर आणि पाषाण परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या पोस्टर्सच्या माध्यमातून थेट अजित पवार यांनाच सवाल केले आहेत.
“दादा हाच का तुमचा वादा?” असा थेट प्रश्न विचारत, संबंधित मतदारांनी वादग्रस्त प्रतिमेच्या उमेदवारासाठी तुम्ही प्रचार करणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. “दादा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती,” अशा शब्दांत नागरिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पोस्टर्सखाली “तुमच्यावर प्रेम करणारे, मात्र प्रभाग क्रमांक ९ मध्ये अमोल बालवडकर यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराज झालेले सर्व मतदार” असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल बालवडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत थेट उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत असंतोष उघडपणे समोर आला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांची तिकीट कापली गेली असून, त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
हीच दडलेली खदखद आता पोस्टर्सच्या माध्यमातून बाहेर येताना दिसत असून, ही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेससाठी घातक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. या अंतर्गत नाराजीचा फटका थेट निवडणुकीच्या निकालावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.


