प्रभाग ९ मध्ये ‘बालवडकर विरुद्ध बालवडकर’ थेट सामना; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने भाजपला बळ
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (सूस–बाणेर–बालेवाडी–पाषाण) हा मतदारसंघ शहरातील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि हाय-व्होल्टेज ठरत आहे. या प्रभागात भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अमोल बालवडकर यांच्यात थेट लढत होत असून, ‘बालवडकर विरुद्ध बालवडकर’ या अनोख्या स्पर्धेकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.प्रभाग ९ मध्ये ‘बालवडकर विरुद्ध बालवडकर’ थेट सामना; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने भाजपला बळ
या निवडणूक रणधुमाळीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपच्या प्रचाराला नवे बळ मिळाले आहे. लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ६ जानेवारी रोजी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोठे भाकीत केले. “प्रभाग क्रमांक ९ मधून लहू बालवडकर हे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी होणारे नगरसेवक ठरतील. हे शब्द लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी खरी ठरेल,” असे ठामपणे त्यांनी सांगितले.
या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, प्रभागातील आरएसएस केडर पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला जात असून, रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक आणि मूलभूत नागरी सुविधा यांसारख्या विकासकामांवर भर देत प्रचार केला जात आहे. पदयात्रा, सोसायटी भेटी आणि नागरिकांशी थेट संवाद यामुळे भाजपची प्रचार मोहीम अधिक वेगवान झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांचा कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजप समर्थकांकडून हा व्हिडिओ सातत्याने शेअर केला जात असून, त्यामुळे अमोल बालवडकरांच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा आहे. या व्हिडिओमुळे त्यांच्या प्रचारात अडथळे निर्माण झाले असून, जरी ते सोसायट्यांमध्ये संवाद साधत असले तरी या प्रकरणामुळे अडचणी वाढताना दिसत आहेत.
या प्रभागात भाजपकडून लहू बालवडकर, रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे यांचा पॅनेल निवडणूक रिंगणात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल बालवडकर, गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे आणि पार्वती निम्हाण यांचा पॅनेल मतदारांच्या भेटी घेत आहे.
आयटी हब आणि मोठ्या प्रमाणावर निवासी मतदार असलेल्या या प्रभागात विकास, पारदर्शकता आणि पक्षनिष्ठा हे निर्णायक मुद्दे ठरत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या भाकितामुळे, तसेच आरएसएस केडरच्या सक्रिय सहभागामुळे लहू बालवडकर यांच्या बाजूने वातावरण अधिक अनुकूल झाल्याचे चित्र आहे.१५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. तोपर्यंत ही लढत ‘निष्ठावंत विरुद्ध बंडखोर’ अशी अधिक रंगतदार होत जाणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

ह

