सुरेंद्र पठारे “यांच” ठरलं लवकरच पक्षप्रवेश होणार?
राजकीय गाठीभेटींना वेग, निर्णय अंतिम टप्प्यात
स्थानिक राजकारणात प्रभावशाली असलेले नेते सुरेंद्र पठारे यांच्या पक्षप्रवेशाबाबतची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय गाठीभेटींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे पक्षप्रवेश निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पठारे येत्या पाच ते दहा दिवसांत अधिकृत पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या घडामोडींमुळे इतर इच्छुक ‘पाटील’ नेतेही प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक ३ – लोहगाव, विमान नगर परिसरातील राजकारणात या प्रवेशामुळे मोठा बदल होण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवर सर्व प्रमुख नेते हालचालीकडे लक्ष ठेवून आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रथम भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली आहे. या दोन्ही भेटींना राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, पक्षप्रवेशाबाबतची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
दरम्यान, अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, सुरेंद्र पठारे यांच्या पुढील भूमिकेकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


