भव्यदिव्य सेटवर सुरू ‘घबाडकुंड’चे चित्रीकरण, कलाकारांची फौज सज्ज
भव्यदिव्य, खर्चिक आणि नेत्रदीपक सेटवर सुरू असलेल्या ‘घबाडकुंड’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरले आहे. कलाकारांची भक्कम फौज, रहस्यमय कथा आणि नेत्रदीपक सादरीकरण यामुळे ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट ठरणार आहे.भव्यदिव्य सेटवर सुरू ‘घबाडकुंड’चे चित्रीकरण, कलाकारांची फौज सज्ज
आयुष्यात कितीही अडचणी पार केल्या, यशाची शिखरे गाठली तरी “अचानक हाती घबाड लागावं” अशी इच्छा मनात राहतेच. पण वास्तवात कष्टाशिवाय पर्याय नाही. तरीही या कल्पनेभोवती गुंफलेली एक थरारक कथा ‘घबाडकुंड’मधून मोठ्या पडद्यावर साकारत आहे.

अॅक्शन, विनोद, रहस्य यांचा भरगच्च मसाला असलेला हा चित्रपट दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी सादर केला आहे. निर्माते रसिक कदम आणि सह-निर्मात्या स्मिता पायगुडे-अंजुटे यांच्या पाठबळाने हा सस्पेन्स थ्रिलर प्रेक्षकांसमोर येत आहे. पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे तब्बल १० ते १२ हजार स्क्वेअर फुटांवर भव्य सेट उभारण्यात आला आहे. पाण्याची कुंड, खोल विहिरी, पुरातन मंदिरे, गूढ गुहा आणि त्यांना जोडणारे मार्ग यांचा वापर रहस्यपूर्ण दृश्यांसाठी करण्यात येणार आहे. मराठीत प्रथमच अशा प्रकारचा विशाल आणि खर्चिक सेट उभारण्यात आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर यांसारखे दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. रहस्य, थरार, विनोदाबरोबरच नात्यांची गुंतागुंत, अविश्वास आणि संशयाचे वातावरण या कथेला अधिक रंगत आणणार आहे.
‘घबाडकुंड’ला व्हेलेंटिना इंडस्ट्रीज लि. चे विशेष सहकार्य लाभले आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजय नवगिरे आणि अक्षय धरमपाल यांनी लेखनाची जबाबदारी पार पाडली आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी, संकलन सौमित्र धाराशिवकर, कार्यकारी निर्माता आकाश जाधव आणि साहसदृश्यांसाठी साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी काम केले आहे.
‘घबाडकुंड’ आपल्या रहस्यमय कथानक आणि भव्य सादरीकरणामुळे प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवेल, यात शंका नाही.
