Daily UpdateNEWSPune | NEWS

व्हायरल व्हिडिओ ठरला निर्णायक; अमोल बालवडकरांचे तिकीट कापण्यावर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

Share Post

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) मधील राजकारण सध्या प्रचंड तापले असून, भाजपच्या उमेदवारी निर्णयामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे तिकीट रद्द करून लहू बालवडकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने सुरू झालेला वाद आता थेट आरोप-प्रत्यारोप आणि पक्षांतरापर्यंत पोहोचला आहे.

तिकीट नाकारल्याचा आरोप करत अमोल बालवडकर यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर या प्रकरणाला अधिकच वेग आला. या सगळ्या घडामोडींवर आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडत तिकीट कापण्यामागचे खरे कारण जाहीर केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. हाच मुद्दा भाजपसाठी निर्णायक ठरला, असे त्यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ चारित्र्य आणि सुसंस्कृत राजकारणाचे प्रतीक आहेत. गृह खात्याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत अचूक आणि संवेदनशील माहिती पोहोचली होती. जर अमोल बालवडकर यांना उमेदवारी देण्यात आली असती आणि प्रचारादरम्यान हे व्हिडिओ बाहेर आले असते, तर पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असता. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन वेळेत निर्णय घेण्यात आला,” असे चंद्रकांत पाटील यांनी ठामपणे सांगितले.

ते पुढे म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ४२ माजी नगरसेवकांची तिकीटे कापली असून, हे निर्णय कोणाच्याही वैयक्तिक विरोधातून नव्हे तर ठोस कारणांच्या आधारे घेतले आहेत. “आमच्या पक्षात मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची पद्धत नाही. योग्य माहिती आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य वेळी निर्णय घेतला,” असे सांगत त्यांनी पक्षशिस्तीवरही भर दिला.

या प्रकरणात आणखी कठोर भूमिका घेत चंद्रकांत पाटील यांनी निलेश घायवळसोबत फोटो किंवा व्हिडिओ असलेल्या इतर व्यक्तींविषयीही माहिती संकलित करून ती थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर केली जाईल, अशी घोषणा केली. आवश्यक वाटल्यास संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्हायरल व्हिडिओ ठरला निर्णायक; अमोल बालवडकरांचे तिकीट कापण्यावर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण