प्रभाग ९ वाहतूक कोंडीवर भाजपचा ठोस आराखडा; लहू बालवडकर यांची विकासदृष्टी स्पष्ट
पुणे महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस–महाळुंगे परिसरातील सर्वात ज्वलंत प्रश्न असलेल्या वाहतूक कोंडीवर भारतीय जनता पार्टीने थेट लक्ष केंद्रित केले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांनी “विकास कागदावर नव्हे, तर रस्त्यावर दिसला पाहिजे” या स्पष्ट भूमिकेतून प्रभागातील वाहतूक आणि रस्ते व्यवस्थेसाठी सविस्तर व कृतीशील आराखडा जाहीर केला आहे.प्रभाग ९ वाहतूक कोंडीवर भाजपचा ठोस आराखडा; लहू बालवडकर यांची विकासदृष्टी स्पष्ट
लहू बालवडकर यांच्या मते, प्रभागातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि अनेक ठिकाणी अपूर्ण राहिलेले रस्ते यामुळे वाहतूक कोंडी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळे केवळ निवडणूक जिंकणे हे उद्दिष्ट नसून, प्रत्यक्षात ही कोंडी कायमस्वरूपी सोडवणे हेच खरे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘दस मे बस’द्वारे सार्वजनिक वाहतुकीला चालना
प्रभागात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि परवडणारी करण्यासाठी ‘दस मे बस’ योजना राबवण्याचा प्रस्ताव बालवडकर यांनी मांडला आहे. या योजनेअंतर्गत १० किलोमीटरपर्यंत केवळ १० रुपयांत प्रवास करता येणार असल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होईल, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण घटेल, तसेच नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बाणेर–बालेवाडी परिसरासाठी भुयारी मार्ग आणि ३० मीटर रुंदीचा रस्ता
वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाणेर–बालेवाडी भागात बीट वाईज चौक, मर्सिडीज चौक आणि मिटकॉन परिसरात प्री-कास्ट तंत्रज्ञानावर आधारित तीन नवीन भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव या रोडमॅपमध्ये समाविष्ट आहे. यासोबतच ज्युपिटर रुग्णालय ते लक्ष्मी माता मंदिर दरम्यान ३० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करणे, दसरा चौक ते सदानंद रेसिडेन्सी रोडवरील अपूर्ण काम तातडीने पूर्ण करणे, बालेवाडी ते कस्पटे वस्ती येथील ‘मिसिंग लिंक’ वेगाने पूर्ण करणे आणि पुनावळे ते चांदणी चौक सेवा रस्त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, अशा ठोस उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.
पार्किंग समस्येवर उपाय : P1–P2 झोन
रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी प्रभाग क्रमांक ९ मध्ये नियोजित P1 आणि P2 पार्किंग झोन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यालगत उपलब्ध असलेल्या अॅमेनिटी स्पेसेसमध्ये नियोजनबद्ध पार्किंग सुविधा निर्माण केली जाणार असून, त्यामुळे अनधिकृत पार्किंगला आळा बसेल आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सुस–पाषाण पट्ट्यासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा
सुस–पाषाण परिसरातील वाहतूक समस्यांवर लक्ष केंद्रित करत स्वतंत्र आणि सविस्तर वाहतूक आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सुस खिंडीतील सेवा रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करून एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करणे, मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्यावरील पदपथांचे रुंदीकरण करणे, सुस पुल ते रवीनगर दरम्यान स्मार्ट सिग्नल प्रणाली बसवणे, सुस रोडवरील अनधिकृत पार्किंगवर कडक नियंत्रण ठेवणे आणि P1–P2 पार्किंग झोन निश्चित करणे यांचा समावेश आहे. तसेच पाषाण, सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी परिसरात पक्क्या, टिकाऊ आणि दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभारण्यावर भर देण्यात आला आहे.
लहू बालवडकर यांनी मांडलेला हा वाहतूक आणि रस्तेविकासाचा सविस्तर रोडमॅप केवळ घोषणांपुरता मर्यादित नसून, प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारित असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांच्या उमेदवारीभोवती विकासाच्या अपेक्षांचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, ही निवडणूक केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर नागरी जीवनाच्या दृष्टीनेही निर्णायक ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.


