मुळशीतील आप्पासाहेब ढमाले विद्यालयात इयत्ता १० वी ३१ व्या बॅचचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळ संचलित आप्पासाहेब ढमाले विद्यालय, खेचरे येथे इयत्ता १० वीच्या ३१ व्या बॅचचा निरोप समारंभ व शुभेच्छा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मा. शरदराव ढमाले साहेब होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार सांगितले. शिक्षण हेच जीवन घडविण्याचे प्रमुख साधन असून आत्मविश्वास, सातत्य आणि कष्ट यामुळे यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन करत त्यांनी इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्रीकांत कदम साहेब यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शनपर विचार मांडले. ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश दूर नसते, असा संदेश त्यांनी दिला. शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. बो-हाडे सर यांनीही आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच शिस्त, संस्कार आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मा. सुंबे सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. परकाळे सर यांनी नेटके व प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री. प्रक्षाळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी मा. रमेश शेठजोरी (सरचिटणीस), मा. सुनील पासलकर, मा. प्रभाकर नाना कंधारे, मा. धैर्यशाल ढमाले, मा. विमोदभाऊ कंधारे, मा. नामदेव भाऊ जाधव (सहसचिव), कोंढवळ्या गावचे माजी सरपंच संतोष कंधारे, खेचरे व बेलावडे गावचे ग्रामस्थ, तसेच शाळेतील इयत्ता १० वी वर्गातील महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सांगता समारंभ पार पडला. त्यानंतर सहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून आनंदी व समाधानी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


