
नांगपूरमध्ये गांजाची शेती उद्ध्वस्त; २१ लाखांचा गांजा जप्त
१७५० गांजाची झाडे जप्त; ५३ वर्षीय शेतकऱ्याला अटक, कोटगुल पोलिसांची धडाकेबाज कारवाई
कोरची तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या नांगपूर गावात घराच्या पाठीमागील परसबागेत गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोटगुल पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करत तब्बल १ हजार ७५० गांजाची झाडे जप्त केली असून, त्यांचे एकूण वजन ४३ किलो ५०० ग्रॅम आहे. जप्त गांजाची अंदाजे किंमत २१ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.नांगपूरमध्ये गांजाची शेती उद्ध्वस्त; २१ लाखांचा गांजा जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, नांगपूर येथील आधारी धनसिंग कपूरढेलिया वय ५८ वर्ष याने आपल्या घराच्या मागील सांदवाडी/परसबागेत गांजाची लागवड केल्याची माहिती कोटगुल पोलिस ठाण्याचे अधिकारी विवेक वायकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ याबाबत गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कपिल आगलावे आपल्या पथकासह कोटगुल पोलिस ठाण्यात दाखल झाले. कोटगुलचे प्रभारी अधिकारी विवेक वायकर यांच्या पथकासोबत संयुक्तरीत्या नांगपूर येथे धाड टाकण्यात आली. यावेळी परसबागेत मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून १,७५० झाडे व ४३.५०० किलो गांजा जप्त केला.
ही कारवाई रविवारी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास करण्यात आली. आरोपी आधारी कपूरढेलिया याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिदुर्गम भागात घराच्या परसबागेतच गांजाची लागवड करून अंमली पदार्थांचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावल्याने कोटगुल परिसरात खळबळ उडाली आहे
ही धडाकेबाज कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल पोलिस ठाण्याचे अधिकारी विवेक वायकर, स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय कपिल आगलावे, एएसआय भजनराव कोडाप, पोलिस हवालदार अनिल हिळामी, श्यामलाल नैताम, महिला पोलिस शिपाई जयश्री तोडासे, मुनेश्वरी मडावी आदींनी केली.

