
मुंबईच्या गिर्यारोहक कविता चंद यांच्याकडून किलीमांजारो राऊंड ट्रिप २३ तासांच्या आत पूर्ण, नवीन भारतीय विक्रम प्रस्थापित
मुंबईतील गिर्यारोहक आणि एन्ड्युरन्स ॲथलिट कविता चंद यांनी किलीमांजारो पर्वतातील उहुरु या शिखराची राउंड ट्रिप २२ तास आणि ३६ मिनिटांमध्ये पूर्ण केली. हे आव्हान २४ तासांच्या आत पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय बनल्या आहेत. तसेच हे ५,८९५ मीटर उंचीचे शिखर त्यांनी १२ तास आणि ४६ मिनिटांमध्ये पूर्ण करून भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात एक लक्षणीय कामगिरी केली आहे.
कविता यांनी म्वेका गेट – उहुरु पीक – म्वेका गेट या मार्गाने जाऊन आफ्रिकेतील हे सर्वात उंच शिखर सर करून परत आरंभबिंदू जवळ परतल्या. किलीमांजारोच्या उंचीशी जुळवून घेण्यासाठी गिर्यारोहकांना पर्वतावरील चढाई आणि खाली उतरणे यासाठी सर्वसाधारणपणे पाच ते नऊ दिवस लागतात. या पार्श्वभूमीवर कविता यांची कामगिरी विशेष ठरते. अनेक महिन्यांची तयारी आणि कित्येक कष्टप्रद सराव सत्रांनंतर ही कामगिरी साध्य झाली आहे. कविता यांनी ११ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या शिकागो मॅरेथॉनसाठी प्रशिक्षण घेतले. त्यासाठी त्या दर आठवड्याला सुमारे ७० ते ९० किलोमीटर धावल्या. तसेच त्यांनी आठवड्यातून तीनदा स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतली. या मॅरेथॉनमध्ये त्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात वेगवान भारतीय महिला ठरल्या.
या मॅरेथॉननंतर लगेचच नेपाळमधील हेमलुंग हिमाल पर्वत (७१२६ मीटर) या मोहिमेसाठी त्या गेल्या. त्या शिखरावर त्या पोचू शकल्या नाही तरी सुमारे ६,६०० मीटर उंचीशी त्यांनी जुळवून घेतले. किलीमांजारोच्या मोहिमेसाठी त्यांना अत्यंत मूल्यवान असा अतिउंचावरील अनुभव प्राप्त करता आला.
आपल्या प्रेरणेविषयी कविता चंद म्हणाल्या, “किलिमांजारो हा सेव्हन समिट्स मोहिमेचा भाग म्हणून आधीपासूनच माझ्या यादीत होता. मी तिथे स्पीड क्लाइंबचा प्रयत्न करावा, असे काही लोकांनी सुचवले होते. मला ती चढाई करायचीच होती त्यामुळे तो अनुभव अधिक साहसी करण्याचा मी विचार केला. ही चढाई १२ तास ४६ मिनिटांत पूर्ण करणे आणि २२ तास ३६ मिनिटांत संपूर्ण फेरी पूर्ण करणे हे अत्यंत विशेष महत्त्वाचे आहे. या प्रवासाचा भाग बनल्याबद्दल आणि हे शक्य करण्यासाठी मदत केल्याबद्दल मला बूट्स अँड क्रॅम्पॉन्सचे भरत आणि रोमिल तसेच संपूर्ण सपोर्ट टीमचे मी आभार मानते.”
बूट्स अँड क्रॅम्पॉन्सने भरत आणि रोमिल यांच्यामार्फत या मोहिमेचे समन्वय केले. त्यांनी टांझानियातील स्थानिक टीमसोबत लॉजिस्टिक्स, मार्गाचे नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था यावर काम केले. कविता यांच्या आगमनापूर्वीच अॅडव्हान्स टीमने ४,६७३ मीटर उंचीवर असलेल्या बाराफू कॅम्प येथे कॅम्प उभारला होता. शिखराकडे जाण्याच्या अंतिम टप्प्यात गाईड १ त्यांच्यासोबत होते, त्यांना समिट पोर्टरची साथ होती, तर गाईड २ यांनी चढाईच्या सुरुवातीच्या टप्प्यात आणि उतरणीदरम्यान मदत केली. इमॅन्युएल यांनी टांझानियातील स्थानिक व्यवस्था सांभाळल्या.
या कामगिरीविषयी बोलताना बूट्स अँड क्रॅम्पॉन्सचे भरत म्हणाले, “२४ तासांपेक्षा कमी वेळेत किलिमांजारोची संपूर्ण फेरी पूर्ण करणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. कविता यांचा निर्धार, सहनशक्ती आणि तयारी यामुळे हे शक्य झाले. भारतीय गिर्यारोहणात हा मैलाचा दगड प्रस्थापित करण्यासाठी त्यांना साहाय्य करता आले याचा आम्हाला अभिमान आहे.”
किलिमांजारो हे कविता यांच्या सेव्हन समिट्स मोहिमेतील पाचवे शिखर आहे. या मोहिमेत सातही खंडांवरील सर्वोच्च शिखर सर करणे अपेक्षित आहे. त्यांनी सहा वर्ल्ड मॅरेथॉन मेजर्सपैकी पाच मॅरेथॉनही पूर्ण केल्या असून आणखी एक करायची आहे आणि इतर अनेक मॅरेथॉनमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. त्यांच्या याआधीच्या गिर्यारोहण कामगिरीमध्ये एलब्रुस, डेनाली, व्हिन्सन आणि अकोंकाग्वा ही शिखरे सर करण्याचा समावेश आहे.
त्यांच्या या ताज्या कामगिरीमुळे त्यांच्या सेव्हन समिट्स मोहिमेत आणखी एक मैलाचा दगड जोडला गेला आहे. तसेच, लांब पल्ल्याच्या धावण्यामध्ये आणि उंचावरील गिर्यारोहणामध्ये असलेली त्यांची सहनशक्तीही यातून अधोरेखित झाली आहे.

