कामगार दिनी भाजप चेंबर असोसिएशनची महत्त्वपूर्ण नियुक्ती; पाचांगणे उपाध्यक्ष, खळदकर सरचिटणीस
कामगार दिनाच्या औचित्याने भारतीय जनता पार्टी चेंबर असोसिएशन, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथे महत्त्वपूर्ण नियुक्ती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अभिजीत पवार यांनी केले.पक्षाची विचारधारा, ध्येय व धोरणे तसेच व्यापारी आणि व्यवसाय क्षेत्रातील कार्य अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यतत्परता आणि अनुभव लक्षात घेऊन चेंबर असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र विभागात श्री. संतोष पाचांगणे यांची उपाध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र) पदावर, तर श्री. संदीप खळदकर यांची सरचिटणीस (पश्चिम महाराष्ट्र) पदावर नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती मा. रंजन (काका) तावरे (चेअरमन, माळेगाव सहकारी साखर कारखाना, माळेगाव तसेच उपाध्यक्ष, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ) यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात व्यापारी व उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच व्यापाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांशी जोडणे आणि संघटनेचे कार्य पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणे राबवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चेंबर असोसिएशन अधिक मजबूत करून पक्षाच्या कार्याला नवी दिशा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, अशी भावना श्री. संदीप खळदकर आणि श्री. संतोष पाचांगणे यांनी व्यक्त केली.श्री. संदीप खळदकर हे सासवड येथील व्यावसायिक असून, श्री. संतोष पाचांगणे हे सातारा जिल्ह्यातील वर्धनगड गावचे मूळ रहिवासी असून सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत.



